मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेसला 440KV चा शॉक.. आता विचार करण्याची गरज, थोरातांची उद्विग्न प्रतिक्रिया
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
21 June 2022, 0:05 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 June 2022, 0:05 IST
  • विधान परिषद निवडणुकीत एक उमेदवार पराभूत झाल्याचे काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या पराभवानंतर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई– महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपने महाविकास आघाडीच्या आत्मविश्वासाचा फुगा फोडला. भाजपने एकही मत नसताना आपली पाचवी जागा निवडून आणली व काँग्रेसच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवला. यावर काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यसभेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सावध होत विधान परिषदेला (MLC Election result) काळजी घेतली होती. अगदी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवण्यापासून मतदान करण्याची रंगीत तालीम देखील घेतली. मात्र, इतकं सारं करुनही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. हाती आलेल्या निकालानुसार देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी झाल्याचे दिसते. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड जिंकले आहेत. दुसरीकडे आपला एक उमेदवार पराभूत झाल्याचे काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या पराभवानंतर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल २१ मतं फुटली आहे. यात काँग्रेसची ३ मतं फुटल्याचे समोर आले आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.

सरकार म्हणून विचार करण्याची गरज - थोरात

विधान परिषदेतील काँग्रेसचा झालेला पराभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर त्यांना माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थोरात म्हणाले, की हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजून असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे.

काँग्रेसची मतं फुटल्याचं बाळासाहेब थोरात यांनी मान्य केलं. पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली नाही. दुसऱ्यांना दोष देणं योग्य नाही. ही जबाबदारी मी घेतो. प्रथम क्रमांकाची मतं आमचीच मते आम्हाला मिळत नाहीत, तर दुसऱ्यांना दोष काही देणार नाही, असे थोरात म्हणाले. 

कॉग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर –

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे सरकार स्थापल्यापासून कधीच नव्हते. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांचे आपआपले गट आहेत. हे गट कधीच पक्षाच्या हितासाठी काम करत नसून एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. याच हेव्या दाव्यांच्या राजकारणातून पुरेसे संख्याबळ हाती असतानाही काँग्रेसला एका उमेदवाराच्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. 

हंडोरेच्या पराभवामुळे दलितांची काँग्रेसवर नाराजी –

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ३ मते फुटल्याचे समोर येत आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना १९ आणि चंद्रकांत हंडोरे यांना २२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. मात्र पहिल्या फेरीत कोणीही विजयी झाले नसल्याने दोघांच्या दुसऱ्या फेरीतील मतांची मोजणी करण्यात आली, मात्र यात जगताप यांना विजयी करण्यात आले व दलित उमेदवार हंडोरे पराभूत झाले. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे काही आमदार फुटल्यामुळे दलित उमेदवाराचा पराभव झाल्याने दलित संघटना काँग्रेसवर नाराज झाल्या आहेत. याचा फटका काँग्रेसला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत बसू शकतो.