मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; मविआच्या आमदारांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; मविआच्या आमदारांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 12:00 PM IST

Maharashtra Assembly Winter Session : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Maharashtra Assembly Winter Session Live Updates
Maharashtra Assembly Winter Session Live Updates (HT)

Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मविआच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशीची विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात आंदोलन केलं आहे.

विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ५० खोके एकदम ओके आणि न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी विधानभवन दणाणून सोडलं. यावेळी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी 'गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी' अशा घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारत कर्नाटक सरकारनं बेळगावात जमावबंदी लागू केली होती. याशिवाय महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी लागू केल्यावरूनही विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळं सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विधीमंडळात दाखल झाले आहेत. त्यामुळं अधिवेशनात आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel