मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिक्षा झाली पण आमदारकी गेली नाही; राहुल गांधींवरील कारवाईमुळं राज्यातील हे आमदार चर्चेत!

शिक्षा झाली पण आमदारकी गेली नाही; राहुल गांधींवरील कारवाईमुळं राज्यातील हे आमदार चर्चेत!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 24, 2023 06:49 PM IST

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींची खासदारकी गेली, परंतु राज्यातील अनेक नेत्यांना शिक्षा झाल्यानंतरही ते अद्यापही आमदार पदावर कायम आहेत.

maharashtra vidhan sabha
maharashtra vidhan sabha (HT)

Rahul Gandhi Disqualification : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळं सूरतमधील कोर्टानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळं आता राहुल गांधींवरील कारवाईवरून देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. परंतु आता राज्यातील काही आमदारांना कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतरही ते पदावर कायम आहेत, अद्याप त्यांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळं आता पक्ष अथवा व्यक्ती पाहून कारवाई होतेय की काय?, असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

शिक्षा झाली पण पद कायम असलेले नेते कोणते?

एका फौजदारी प्रकरणात भिवापूर कोर्टानं भाजपा आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं.

अर्जून खोतकर (शिवसेना)

पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि सध्या शिंदे गटात असलेले माजी आमदार अर्जून खोतकर हे १९९० साली पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यावेळी त्यांचं वय केवळ २२ वर्ष होते. आमदार होण्यासाठी २५ वर्षांची वयोमर्यादा असतानाही खोतकरांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं परंतु सुनावणीला विलंब झाला. परिणामी खोतकर यांनी आमदारकीची टर्म पूर्ण केली होती. त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

रत्नाकर गुट्टे (रासप)

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील तब्बल २७ हजार शेतकऱ्यांच्या नावावर ५५०० कोटी रुपयांचं पीककर्ज उचलल्याच्या आरोपाखाली रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना शिक्षा झाली होती. परंतु त्यांच्यावर अपात्रतेची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे आमदार गुट्टे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि ते जिंकलेसुद्धा.

बच्चू कडू (प्रहार)

२०१७ साली दिव्यांगासाठी केलेल्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर पाच वर्षांनी या प्रकरणात निकाल लागला. कोर्टानं बच्चू कडू यांना शिक्षा सुनावली. परंतु त्यांच्यावर अद्यापही अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही.

यशोमती ठाकूर (काँग्रेस)

किरकोळ कारणावरून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी २०१२ साली वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर या प्रकरणात अमरावती कोर्टानं ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. परंतु त्यांची आमदारकी कायम राहिली.

WhatsApp channel