Suresh khade controversial statement : मिरज मतदारसंघातून गेल्या चार वेळा विजय मिळवलेले व राज्याचे माजी मंत्री भाजप नेते सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो, मी जातीने चांभार म्हणजे दलित आहे, मात्र हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नाही, असे म्हणत त्यांना आपल्या मतदारांचाच अपमान केला आहे. सांगलीत आयोजित हिंदू गर्जना सभेत खाडे बोलत होते. या सभेला नितेश राणेही उपस्थित होते, त्यांनीही भडकाऊ भाषण केलं.
सांगलीत पार पडलेल्या हिंदू गर्जना सभेला मंत्री नितेश राणे (Nitesh rane),माजी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत बोलताना खाडे यांनी धर्मनिरपेक्ष देशाला हिंदूराष्ट्राकडे नेण्याचा इरादा बोलून दाखवला. ते म्हणाले की, आम्ही हिंदू चांभार आहोत. दलित असलो तरी हिंदू आहोत. हिंदूराष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाहीत. हिंदू राष्ट्र झाले तर अजिबात चिंता नाही. हिंदू राष्ट्रनिर्मितीकडे केंद्र सरकारची पावले पडत आहे, त्याला आपलीही साथ हवी. हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे, अशी आपलीही मागणी असल्याचे खाडे म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी मिरज मतदारसंघाला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधत मतदारांचा अपमान केला आहे.
महायुतीचा लोकसभेला निसटता पराभव झाला मात्र विधानसभेला हिंदू समाजाने ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणांचे महत्त्व लक्षात घेऊन चांगले काम केले. त्यामुळे विरोधक किरकोळ झाले असून त्यांना विरोध पक्षनेताही करता येत नाही. त्यांना विधीमंडळात बोलायला संधीत मिळालेली नाही.
या सभेत मंत्री नितेश राणे यांनीही हिंदू राष्ट्रावर बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. राणे म्हणाले की, विरोधक ईव्हीएमविरोधात बोलत असतात. पण ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’ असा लाँग फॉर्म राणे यांनी सांगितला.विरोधक ईव्हीएमला दोष देतात. पण विधानसभेला आम्ही ईव्हीएमवरच निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट्स अगेन्स्ट मुल्ला. ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.
नितेश राणे म्हणाले राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, आम्हालाही विशाळगडावर १२ तारखेला ऊरुस कसा भरतो, ते बघायचंय, असं म्हणत १२ जानेवारीला विशाळगडावर आयोजित केलेल्या ऊरुसाला नितेश राणे यांनी विरोध केला आहे. १२ तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचं काम करु नये. हिंदू समाजाने संयमाने घेतलं असताना इतर समाजानेही संयमाने घ्यावे,उगाच चिथावण्याचे काम करु नये, उरुस भरवून कोणालाही चिथावण्याचा प्रकार करू नये, असे राणे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या