Suresh Dhas Dhananjay Munde Meeting : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. विरोधी पक्षासह भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उठवून त्यांना चांगलेच घेरले होते. धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात असून त्याचा आका मुंडे असल्याचे आरोप करत धस यांनी धनंजय मुंडे यांना घेरले होते. बीडमधील दहशतवाद मोडून काढण्याची भाषा करत धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. त्यातच मुख्यमंत्री फडवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. यानंतरही धस यांनी मुंडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले होते. परंतू, आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यातील वैर संपल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंडे आणि धस यांची भेट एखा खासगी रुग्णालयात घडवून आणण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर बावनकुळे यांनी ही भेट झाल्याची कबुली दिली होती, मात्र मुंडेंच्या कार्यालयाने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगून हे वृत्त फेटाळले आहे.
या भेटीबाबत बावनकुळे म्हणाले की, आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्यात भेट झाली. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील.
दरम्यान धस-मुंडे भेटीवर अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला हे चार-पाच दिवसांपूर्वी समजलेले. बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचे मला सांगितले गेले होते. अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहे. धस आता मुंडेंविरोधात लढतील की नाही, काही खरे नाही.
या भेटीबाबत सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करणं आणि त्यांच्याविरोधातील लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बीड प्रकरणात मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते माहिती नाही. मी परवा मुंडेंच्या घरी गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असे धस यांनी सांगितले.
संबंधित बातम्या