Srinivas Vanaga Not Reacheble : एकनाथ शिंदे यांच्या बरोबर तब्बल ३९ जणांनी बंड केले. यात पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा देखील समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी सर्व बंडखोर आमदारांना उमेदवारी दिली. मात्र, श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करण अशी धमकी दिली होती. दरम्यान, वनगा हे बेपत्ता असून गेल्या १२ तासांपासून त्यांचा फोन नॉट रीचेबल आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे गेल्या बारा तासांपासून नॉट रिचेबल असून ते सोमवारी संध्याकाळी घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप घरी परतले नसून त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. वनगा यांचे फोन देखील बंद आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांना सोडून सर्व बंडखोरांना उमेदवारी दिली आहे. मात्र, वनगा यांना उमेवारी नाकारण्यात आली आहे. पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावित यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊन देखील त्यांना उमेदवारी न मिळाल्याने वनगा नाराज झाले होते. सोमवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत त्यांच दुख: व्यक्त केलं होतं. यावेळी वनगा हे रडले देखील होते. एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी उद्धव ठाकरेंचे मोठे कौतुक करत उद्धव ठाकरे देव असल्याचं वनगा यांनी म्हटलं होतं.
खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना आमदारकीची संधी दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा विश्वास घात करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तिकिट कापल्याने श्रीनिवास वनगा मानसिक तणावाखाली होते. यामुळे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागल्याचे ते म्हणाले होते. दरम्यान, सोमवारी संध्याकाळ पासून ते बेपत्ता आहेत. ते घरातून निघून गेले असून ते कोठेच सापडत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतातूर आहे. वनगा यांचे दोन्ही फोन बंद असल्याने आता कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू करण्यात आला आहे.