बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभर गदारोळ माजला आहे. संतोष देशमुख प्रकरणी फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता य़ा प्रकरणावरून महायुतीतच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असतानाच आता महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात ९४२ बंदुक परवानाधारक आहेत. केवळ बीड शहरात १२२२ बंदुकीचे लायसन्स आहेत. तिथे लोक खुलेआम बंदुका चालवतात. १९९२ मध्ये बीडमधील एका राजकीय नेत्याच्या घरातून एक आयएएस अधिकारी गायब झाले. ते अद्याप सापडलेले नाहीत, असा दावा संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमका तो राजकीय नेता कोण? गायब झालेला आयएएस अधिकारी कोण? याची चर्चा रंगली आहे.
आमदार गायकवाड म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोन मंत्र्यांचा अप्रत्यक्ष समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र कुठला मंत्री या घटनेत सहभागी असेल, याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र लोकांना दिसत आहे की, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे,त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही, असा उल्लेख केला होता. तो खंडणीखोर आहे. या प्रकरणात त्याने दोन कोटीचे खंडणी मागितली आणि त्यानंतर हे पुढचे प्रकरण घडले. संतोष देशमुख यांचा खून झाला. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची नेत्यांनी पाठराखण करणे चुकीचे असल्याचे परखड मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. जनतेच्या मनात प्रचंड राग असून हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे आज सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बीडमध्ये मूक मोर्चा काढला,असे संजय गायकवाड यांनी म्हटले.