राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख देणार; शिंदे सेनेच्या आमदाराच्या वक्तव्यामुळं मोठा वाद-mla sanjay gaikwad controversial remark against rahul gandhi said will give 11 lakh for chopping rahul tongue ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख देणार; शिंदे सेनेच्या आमदाराच्या वक्तव्यामुळं मोठा वाद

राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाख देणार; शिंदे सेनेच्या आमदाराच्या वक्तव्यामुळं मोठा वाद

Sep 16, 2024 05:49 PM IST

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास ११ लाख देणार; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास ११ लाख देणार; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

Rahul Gandhi : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये देईन, असं गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे.

आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. 'राहुल गांधी यांना भारतातील आरक्षण संपवायचं आहे. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलाय. त्यांची मानसिकता आरक्षणाला विरोध करणारी आहे, असं गायकवाड यांनी म्हटलंय.

'राहुल गांधी यांचं वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचं पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असं खोटं नरेटिव्ह पसरवतात. पण प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये बक्षीस देईन, असं संजय गायकवाड म्हणाले.

गायकवाड टीकेच्या रडारवर

गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. 'संजय गायकवाड यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर केली जायला हवी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. येत्या काळात महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

‘संजय गायकवाड हे समाजात आणि राजकारणात राहण्याच्या लायकीचे नाहीत. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतात का, ते आता पाहावं लागेल, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनीही या वक्तव्याचा निषेध केला. ’या लोकांनी राज्याचं राजकारण नासवलं आहे, असं ते म्हणाले.

भाजप चार हात लांब

संजय गायकवाड यांच्या वक्तव्यापासून भाजपनं स्वत:ला लांब ठेवलं आहे. या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?

अमेरिका दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं होतं. भारतात आजही विषमता आहे. पक्षपात आहे. हा पक्षपात थांबला तर आरक्षण संपवण्याचा विचार होऊ शकतो. मात्र, सध्या देशात तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असं राहुल गांधी म्हणाले होते.

Whats_app_banner
विभाग