शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर समोर आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार मलाच असल्याचे सांगत नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना बहाल केला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. या निर्णयाचा आधार घेऊन मी निकाल देत आहे. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. कोणताही निर्णय पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणी घेणार व तोच फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. तसेच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा अधिकार नसल्याचेही राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
सुप्रीम कोर्टाने पक्ष संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्षाला महत्त्व दिले आहे. न्यायालयाने भरत गोगावलेची प्रतोदपदी केलेली नियुक्ती अवैध ठरवली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय बदलले आहेत.