मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘आमचा विठ्ठल चांगला, पण बडवे भेटू देत नाहीत’; आमदाराची खंत..
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
23 June 2022, 4:57 AM ISTSuraj Sadashiv Yadav
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 4:57 AM IST
  • देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले असून त्यांनी विमानतळावर आपलं तिकिट दाखवत गुवाहाटीला जात नसल्याचं सांगितलं.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्याही वाढत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुकवरून संवाद साधत ज्यांना मी मुख्यमंत्री नकोय त्यांनी समोर येऊन सांगावं असं म्हटलं. तसंच मी माझ्या प्रकृतीमुळे काही काळ कुणाला भेटू शकलो नाही असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं. दरम्यान अपक्ष आमदार देंवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी एकनाथ शिंदे लवकरच स्वगृही परततील आणि मातोश्रीवर जातील असं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांच्या आजुबाजुचे लोक त्यांना भेटू देत नसल्याची तक्रारही देवेंद्र भुयार यांनी केली. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले आहेत. मात्र विठ्ठलाभोवती जसे काही वाईट बडवे होते, तशी स्थिती आहे. विठ्ठल चांगला आहे. मातोश्री पवित्र आहे. पण विठ्ठलाच्या आजुबाजुला असलेले बडवे वाईट आहेत."

विठ्ठलाच्या आजुबाजुचे बडवे म्हणजे नेमकं कोण असं विचारलं असता भुयारांनी राऊत चांगले असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार व्यवस्थित चालण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. मी दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो. तेव्हा राऊतांमुळेच भेट शक्य झाली होती असं भुयार यांनी सांगितले.

मिलिंद नार्वेकर यांचे काम वगैरे त्यांच्या आमदारांना माहिती आहे. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार नाराज होण्याचं कारण मातोश्रीवरील काही बडवे आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ देत नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क होऊ देत नाहीत आणि त्यामुळेच सध्या ही वेळ आली आहे. या आजुबाजुच्या बडव्यांमुळे विठ्ठलाची बदनामी होतेय असंही भुयार यांनी म्हटलं.

देवेंद्र भुयार हे अजित पवार यांना भेटण्यासाठी मुंबईला निघाले आहेत. यावेळी त्यांना तुम्ही खरंच मुंबईला निघाला आहात की गुवाहाटीला निघालात असे विचारले असता भुयार म्हणाले की, "आडवातिडवा मार्ग मी धरत नाही, माझ्याकडे मातोश्रीचा मार्ग नाही. मी रेशीमबागेत जात नाही. मी फक्त सिल्वर ओकवर जातो" यावेळी भुयार यांनी विमानाचे तिकिटही दाखवलं.