Mukhyamantri Teerth Darshan yojna Add : राज्य सरकारने सध्या विविध योजनांचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ व वयोवृद्धांसाठीही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा ६० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना लाभ घेता येणार आहे. देशातील ६६ तीर्थक्षेत्रांसाठी ही योजना आहे. या योजनेचे जाहिरात फलक सरकारने जारी केले आहे. मात्र, या जाहिरातीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या फलकावर तीन वर्षांंपासून बेपत्ता असलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो लावण्यात आला आहे.
हा फलक पाहून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एक कुटुंब चांगलेच हादरले आहे. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले मुलाच्या वडिलांचा फोटो या जाहिरातीत झळकला असल्याने बेपत्ता व्यक्तीच्या मुलाने थेट पोलिसांत धाव घेत वडिलांना शोधून देण्याची मागणी केली आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहिर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव झाल्याने विधानसभा निवडणुकीची तयारी सरकार करत आहेत. या साठी विविध योजना जाहीर करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा राज्यात सुरू आहे. असे असतांना आता लाडका भाऊ आणि मुख्यमंत्री तीर्थ योजना देखील सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ योजनेतून सरकार देशातील ६६ ठिकाणी राज्यातील ६० वर्षांवरील वृद्ध व्यक्तिंना तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी नेणार आहेत. यासाठी ३० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भात सरकारने जारी केलेल्या एका जाहिरात फलक सध्या वादात सापडला आहे. तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर एका तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला आहे.
जाहिरातीत फोटो लावलेल्या वृद्ध व्यक्तिचे नाव ज्ञानेश्वर विष्णु तांबे असे आहेत. ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी आहेत. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून ते बेपत्ता आहेत. याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिस ठाण्यात देत त्यांचा शोध घेतला होता. मात्र, अचानक मुख्यमंत्री तीर्थ योजनेत दिसल्याने या कुटुंबाला धक्का बसला. तांबे यांचा मुलगा भरत तांबे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून माझे वडील बेपत्ता होते. आम्ही त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. आम्ही त्यांचा फोटो मुख्यमंत्री तीर्थ योजनेच्या जाहिरात फलकावर पहिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या वडिलांना शोधून द्यावे ही विनंती.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेनुसार ६० वर्षे वयावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी ही योजना फायद्याची ठरु शकते, असे या योजनेच्या जाहिरातीतून सांगण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना सरकारकडून तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. याच योजनेच्या जाहिरातीवर छापण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. ही वृद्ध व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असून ती थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकल्याने तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. मात्र, आता यावरुन राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
तीर्थ दर्शन जाहिरातीत तांबे यांचा फोटो कुठून आला यासंदर्भात सरकारने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सरकारच्या या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करून सरकार तोंडघशी पडले आहे. सरकार पुन्हा त्याच त्याच चुका कारत असून एका जाहिरातीत सियाचीनचा भाग पाकिस्तानमध्ये दाखवला असल्याचा आरोप त्यांनी केला असून सरकार स्वत:च्या जाहिरातींसाठी लोकांच्या भावनांशी खेळत असल्याचं सिद्ध झालं आहे, असे अंधारे म्हणाल्या.
संबंधित बातम्या