Ashok Dhodi Found Dead: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ माजली. अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड येथील बंद दगडखाणीत बेवारस अवस्थेत असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळून आला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी दिली.
अशोक धोडी हे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून २० जानेवारीपासून बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धोडी यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची आठ पथके तयार करण्यात आली. यादरम्यान, पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये शोध मोहिम सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. अशोक धोडी यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड येथील बंद दगडखाणीत एका कारच्या डिक्कीमध्ये लपवण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर खाणीतील ४० ते ४५ फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून कार बाहेर काढण्यात आली. याप्रकरणातील तीन आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.
अशोक धोडी यांचे चिरंजीव आकाश धोडी यांनी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. गुरुवारी आकाश आणि त्याच्या आईने अशोक धोडी याच्या भावाचा बेपत्ता होण्यामागे हात असल्याचा आरोप केला होता. दोन्ही भावांमध्ये वारंवार भांडणे होत असत आणि माझ्या पतीला सतत धमकावले जात असे. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. एका कार अपघातात त्याला जीवे मारण्याचा ही प्रयत्न झाला होता. त्याचा भाऊ दारू माफियांचा भाग आहे,' अशी माहिती मृताच्या पत्नीने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
माझ्या वडिलांनी दारूशी संबंधित बेकायदेशीर कृत्यांबद्दल अनेकदा तक्रार केली होती. मुख्य आरोपींविरोधात गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत,' असा आरोप आकाशने केला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना डहाणू न्यायालयाने गुरुवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संबंधित बातम्या