Chiplun news : कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसात चिपळूणमधील डीबीजे कॉलेजचा विद्यार्थी सिद्धांत प्रदीप घाणेकर (वय १९) हा शुक्रवारी बेपत्ता झाला होता. याची तक्रार देण्यात आली होती. मात्र, त्याचा मृतदेह हा शनिवारी कॉलेजच्या सीमाभिंतीच्या ढिगाऱ्याखाली आढळला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) उभारलेली आणि महाविद्यालयाने बांधलेली भिंत धोकादायक असल्याचे यापूर्वी काही तज्ञांनी सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही भिंत जोरदार पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळी कोसळली. या भिंतीच्या ढीगाऱ्यात दबून घाणेकरचा मृत्यू झाला, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील देगाव (दापोली) येथील असलेला सिद्धांत घाणेकर हा डीबीजे महाविद्यालयात संगणक शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी चिपळूणजवळील लोटे गावात मामाकडे राहत होता. शुक्रवारी रात्री तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी सर्व मित्रांना फोन करून त्याच्याबद्दल विचारले. पण कोणालाही काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. ही तक्रार त्याचा भाऊ ओंकार घाणेकर याने दिली.
कॉलेजने उभारलेल्या दगडी संरक्षक तारा व सिमेंट काँक्रीटने बांधलेल्या १४ ते १५ फूट उंच सीमाभिंतीचा काही भाग शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे ढासळला. पाऊस जोरदार असल्याने सिद्धांतने या भिंती जवळील बंद झोपड्यांमध्ये आश्रय घेतला असावा. आणि याच वेळी भिंत त्याच्यावर कोसळली असावी, अशी शक्यता एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. शुक्रवारी सायंकाळीच भिंत कोसळल्याचे आम्हाला दिसले. याची माहिती आम्ही कॉलेज व्यवस्थापनाला दिली. मात्र, हा ढिगारा तातडीने हटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, असे विद्यार्थ्याने सांगितले.
पोलिस सिद्धांतचा शोध घेत होते. त्याचे मोबाइल लोकेश पाहिले असता ते कॉलेजच्या दीड किलोमीटरच्या परिघात असल्याचे आढळले. विद्यालय परिसराच्या आवारात त्याचा शोध घेतला असता कॉलेजमध्ये एका सुरक्षा रक्षकाने आदल्या दिवशी भिंत कोसळल्याची घटना सांगितली. त्यानंतर पोलिस पथक व कॉलेज प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर हा ढिगारा खोदण्यात आला, त्यानंतर काही वेळाने ढीगाऱ्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
ही सीमा भिंत धोकादायक असल्याचे या पूर्वीच अनेकांनी सांगितले होते. मुसळधार पावसात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने या परिसराला सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या विमा योजनेत मृत विद्यार्थ्याची नोंदणी झाली असल्याने त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट यांनी दिली. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता सध्या सुरू असून, कॉलेज व्यवस्थापन घाणेकर यांच्या कुटुंबीयांना मदत करत आहेत तसेच त्यांना सरकारी मदत देण्याची मागणी देखील केली जात आहे. घाणेकर कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विम्याची रक्कम जलदगतीने देण्यात यावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी केली आहे.
संबंधित बातम्या