राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा भाईंदरमध्ये संतापजनक घटना समोर आली असून येथे एका महिलेच्या घरात घुसून नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पीडिता घरात एकटीच असतानात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव गौतम असे आहे. ही घटना शनिवारी (१४ सप्टेंबर) रोजी रात्रीच्या वेळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ही महिला घरात एकटीच असताना आरोपी गौतम घरात घुसला. घरात घुसताच त्याने महिलेचे हातपाय आणि तोंड ओढणीने बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून महिलेसमोरच दारू प्यायला सुरुवात केली. दारू प्यायल्यानंतर त्याने पुन्हा महिलेवर अत्याचार केला. यावेळी महिलेची तीन वर्षीच्या मुलगीही घरात झोपली होती. मात्र आरोपीने तिला काही इजा पोहोचवली नाही. महिलेचा घरमालक शेजारीच रहातो, मात्र त्यादिवशी ते सुद्धा बाहेर गेले होते.
महिलेचे हातपाय व तोंड बांधल्याने महिला बाहेर येऊ शकत नव्हती व ओरडूही शकत नव्हती. महिलेने वॉशरुमला जाण्याचा बहाणा करत कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली व शेजारी राहणाऱ्या घरमालकाकडे गेली. मात्र घरमालकही घरात नव्हते. जवळपास कोणीच नसल्याचे पाहून महिलेने रस्त्यावर येऊन आरडाओरड केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आरोपी गौतम पुन्हा याच परिसरात फिरताना स्थानिकांना दिसला. पीडित महिलेने ओळख पटवून दिल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. भाईंदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपी विरोधात चोरी, विनयभंग आदि चारहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.