Palghar Rape: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पालघर येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Rape: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पालघर येथील धक्कादायक घटना

Palghar Rape: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पालघर येथील धक्कादायक घटना

Dec 21, 2024 08:03 AM IST

Minor Girl Raped In Palghar: पालघरमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पालघर: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पालघर: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (AFP)

Palghar News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना पालघरमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा किळसवाणा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पालघरमध्ये एका महाविद्यालयात शिक्षण घेते. पीडिता गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी तिच्याजवळ आला आणि तिला मोटारसायकलवरून घरी सोडतो असे सांगितले. आरोपी हा ओळखीचा असल्याने पीडिताही त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. परंतु, आरोपीने तिला घरी सोडण्याऐवजी परिसरातील एका निर्जनस्थळी नेले आणि तिथे तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध करताच आरोपीने तिला मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.

घरी परतल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. यानंतर पीडिताच्या घरच्यांनी तिला सोबत घेऊन जवळचे पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब कारवाईला सुरुवात करून आरोपीला अटक केली. याप्रकरणातील आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

राज्यात गेल्या पाच वर्षात बलात्काराच्या घटनेत वाढ

राज्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बलात्काराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या आहेत. दरम्यान, २०१७ मध्ये राज्यात एकूण ४ हजार ३२० बलात्काराच्या घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ४ हजार ९७४ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. तर, २०१९- ५ हजार ४१२ घटना, २०२० मध्ये ४ हजार ८४६ घटना, २०२१- ५ हजार ९५४ घटना, २०२२ मध्ये ७ हजार ८४ आणि २०२३ मध्ये ७ हजार ५२१ घटना घडल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर