सोशल मीडियावरील ओळखीचे पुढे प्रेमात रुपांतर झाल्याचे व या प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तरुणी आल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षात समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली असून इन्स्टाग्रामवरील ओळखीतून नेपाळची अल्पवयीन मुलगी थेट मुंब्र्यात आली मात्र तिच्यासोबत भलतेच घडले आहे.
नेपाळमधील १५ वर्षाची मुलगी व ठाण्यातील २२ वर्षीय तरुणामध्ये चॅटिंग सुरू झालं. त्यातून प्रेम झालं. एकमेकांचे नंबर घेतले, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि नंतर प्रियकराला भेटण्यासाठी १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी थेट नेपाळची सीमा ओलांडून मुंबईत आली. मात्र प्रियकराने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला वाऱ्यावर सोडून दिलं. अत्याचारानंतर मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना मुंबईकर प्रवाशांमुळे ही घटना समोर आली.
पीडित मुलगी दादर लोकलमध्ये भेदरलेल्या अवस्थेत बसलेली होती. तिची चौकशी करून तिला दादर स्थानकाच्या पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यावर घडलेला प्रसंग समोर आला व आरोपीला बेड्या ठोकल्या
पीडिता व आरोपीची महिन्याभराचीच ओळख आहे. त्यानंतर आरोपीने मुलीला मुंबईत येण्याची गळ घातली तसेच ती आली नसल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. यानंतर मुलगी घरात कोणालाही न सांगता नेपाळहून मुंबईत आली.
१७ मार्च रोजी पीडितेने बसने गोरखपूरपर्यंत प्रवास केला. त्यानंतर ट्रेनने ती मुंबईत आली. १९ मार्च रोजी कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये दोघांची भेट झाली. तेथून ते मुंब्र्यात गेले. तेथे आरोपीने एक खोली भाड्याने घेतली होती. तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला त्याच दिवशी दिवा स्थानकावर सोडून आरोपी पसार झाला. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा फोन काढून घेतला होता. मात्र पीडितेला त्याचा मोबाईल नंबर पाठ होता. त्यावरून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.