Pune Chandani Chowk : पुणेकरांची कोंडी कायमची सुटणार; चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचं आज लोकार्पण
chandani chowk flyover plan : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
pune chandani chowk flyover inauguration ceremony : पुण्यातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला. त्यानंतर आता तिथेच नव्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन तसेच भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. त्यानंतर आता काम पूर्ण झाल्यामुळं नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
चांदणी चौकातील जुन्या पुलामुळं अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळं पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. तब्बल ३९७ कोटी रुपयांचा खर्च करत नव्या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळं आता कोथरूड-मुळशी, सातारा-मुळशी, मुळशी-पुणे, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण-बावधन आणि पाषाण-मुंबई या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. नव्या उड्डाणपुलासह काही भुयारी मार्ग देखील तयार करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दोन सर्व्हिस रोड आणि आठ रॅम्प यासह १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर थोड्याच वेळात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वाहतूक कोंडी होत असल्याने चांदणी चौकातील पूल स्फोटकं लावून पाडण्यात आला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचं काम सुरू झालं, परंतु सतत वाहतूक कोंडी होत असल्याने अनेकदा नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. चांदणी चौकातील नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास त्यामुळं वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे. पूल पाडल्यानंतर विक्रमी वेळेत नवा पूल बांधून देणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्यानंतर आज गडकरी यांच्याच हस्ते चांदणी चौकातील नव्या पूलाचं उद्घाटन केलं जाणार आहे.