मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेत दुसऱ्या भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासमखास मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर?

शिवसेनेत दुसऱ्या भूकंपाची शक्यता! ठाकरेंचे खासमखास मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 01, 2022 10:51 AM IST

Milind Narvekar: चंपा सिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा शिंदे गटात येत आहेत असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मिलिंद नार्वेकर
मिलिंद नार्वेकर (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Milind Narvekar: बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता शिवसेनेत दुसऱ्या भूकंपाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चंपा सिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरसुद्धा शिंदे गटात येत आहेत असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले आतापर्यंतचे नेते जेव्हा उद्धव ठाकरेंवर आरोप करत होते, तेव्हा त्याचं खरं लक्ष्य मिलिंद नार्वेकर हे होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच नार्वेकरांची पाठराखण केली होती. पक्षात त्याचं महत्त्व प्रचंड होतं. त्यांना पक्षाचं सचिव पदही देण्यात आलं होतं.

एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांनाच दिली होती. मात्र, पक्षात उभी फूट पडल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरच्या गणपतीच्या दर्शनाला बोलावलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांना बाजूला केल्याची चर्चा आहे. त्यातच आता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, आम्ही 50 खोके घेतले असतील, पण ज्या चंपासिंह थापाने बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. त्यांना अग्नीडाग दिला, तो थापा आमच्याकडे आलाय. आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आणखी एक वक्तव्य केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की, "बिग बॉसमध्ये बोलावलं तर नक्की जाईन. तिथं जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल. शाळेत, महाविद्यालयात नाटकात, गाण्यांमध्येही भाग घेत होते. त्यामुळे आता जर बिगबॉसमध्ये बोलावलं तर नक्कीच जाईन." मराठी बिग बॉस होस्ट करणाऱ्या महेश मांजरेकर यांना राजकारणातला कोणता चेहरा बिग बॉसमध्ये बघायला आवडेल असं विचारलं होतं तेव्हा त्यांनी गुलाबराव पाटील यांचेच नाव घेतले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या