मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोयता गँगच्या नाड्या आवळण्यासाठी सरकारकडून हालचाली; आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत होणार कारवाई

कोयता गँगच्या नाड्या आवळण्यासाठी सरकारकडून हालचाली; आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत होणार कारवाई

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 26, 2023 03:44 PM IST

Koyta Gang In Pune : कोयता गँगकडून नागरिकांवर हल्ले करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आता आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Koyta Gang In Pune City
Koyta Gang In Pune City (HT)

Koyta Gang In Pune City : गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील विविध भागांमध्ये निष्पाप नागरिकांवर कोयत्यानं हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्चशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सिंहगड रोड, हडपसर, नाना पेठ आणि मांजरी या भागांमध्ये अनेक लोकांवर कोयता गँगकडून हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता या घटनांना आळा घालण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.

पुण्यातील नागरिकांवर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या कोयता गँगच्या आठ ते नऊ ग्रुपच्या आरोपींना आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता कुणी नागरिकांवर हल्ले केले तर एकालाही सोडलं जाणार नाही. या प्रकरणातील ४० ते ५० आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोयता गँगमधील काही आरोपींचं आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय इतरांना धडा मिळणार नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या सिंहगड रोडवर कोयता गँगकडून नागरिकांवर हल्ले करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याशिवाय पेठांचा भागांसह उपनगरांमध्येही कोयता गँगनं धुमाकूळ घातला होता. याशिवाय सिंहगड रोड परिसरात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भररस्त्यात तुडवलं होतं. त्यानंतर आता आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्यामुळं या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp channel