Mumbai weather update : राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. विदर्भ, मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील पडत आहे. दरम्यान, राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत देखील तापमानात मोठा बदल झालेला आहे. मुंबईत, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. सकाळी आणि संध्याकाळी मुंबईत थंड वारे वाहत आहे. यामुळे दमट हवामानापासून मुंबईकरांची सुटका झाली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा झंझावात सध्या सक्रिय आहे. याचा परिमाण राज्याच्या वातावरणावर होत आहे. हे वारे मुंबईसह किनारपट्टीवर येत असल्याने मुंबईसह, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. या सोबतच मुंबईत आकाश अंशत: ढगाळ असून त्यामुळे देखील तापमानात घट झाली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस मुंबईत गारवा वाढण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार हिमालयीन परिसरासह उत्तर भारतात पश्चिम विक्षोभ सक्रिय आहे/ उत्तरेकडून येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून येत असून तो मुंबईसह किनारपट्टीवर येत असल्याने थंड वारे वाहू लागले आहे. दरम्यान, हे थंड वारे अरबी समुद्रातील बाष्प वाहून आणत असल्याने मुंबईत तापमानात घट झाली आहे. तसेच थंडीत वाढ झाली आहे. रविवारी मुंबईत मोट्या प्रमाणात थंड वारे वाहत होते. तर दिवसभर गारठा जाणवत होता. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळ होते. रविवारी डहाणू येथे २३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर हर्णेत २३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाब्यात २३.३ आणि सातांक्रुजमध्ये २४.४ तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात गेल्या दोन दिवसांपासून मोठी घट झाली आहे. मुंबईत पुढील काही दिवस गारठा वाढणार आहे. तर या सोबतच आज तुरळक ठिकाणी पाऊस होण्याच अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह किनारपट्टीवर किमान तापमानात घट होऊन काहीसा गारवा जाणवू शकतो.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. आज देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बहुतांश भागात वातावरण हे ढगाळ राहणार आहे.