Maha Vikas Aghadi : मविआत आणखी एका नव्या पक्षाची एन्ट्री?, खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Maha Vikas Aghadi New Party Alliance : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
Maha Vikas Aghadi New Party Alliance : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत भाजपाचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळं आता कर्नाटकासह देशभरातील विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवल्यास भाजपाचा पराभव करणं शक्य असल्याचं वक्तव्य अनेकदा मविआच्या नेत्यांनी केलेलं आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच आता महाविकास आघाडीत आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपाला हरवण्यासाठी मविआशी युती करण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, भाजपाला हरवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. भाजपाचा पराभव होणार असेल तर एमआयएम पक्ष महाविकास आघाडीशी युती करण्यास तयार असल्याचं खासदार जलील यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला महाविकास आघाडीचे नेते कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी युती केलेली आहे. परंतु वंचितने अद्यापही मविआत प्रवेश केलेला नाही. भारतीय जनता पक्ष समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. आपणच कायमस्वरुपी पंतप्रधान राहू असं नरेंद्र मोदी यांना वाटतं, परंतु तसं होणार नाही. जी गोष्ट वेगाने वर जाते, ती तितक्याच वेगाने खाली येत असते. परंतु तोपर्यंत देशाचं मोठं नुकसान झालेलं असेल, असंही खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.