Imtiyaz Jaleel : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबची कबर हटवून ती हैदराबादला पाठवून देण्याची मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केली आहे.
MP Imtiyaz Jaleel On Aurangzeb Graveyard Khuldabad : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यानंतर आता एमआयएम आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटलं आहे. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांनी खुलदाबादेतील औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकांना पीएम नरेंद्र मोदी यांच्या परवानगीची गरज कशाला आहे?, असं म्हणत खासदार जलील यांनी शिंदे गटाच्या आमदारांना टोला हाणला आहे. त्यामुळं आता औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
संभाजीनगरच्या खुलदाबादेतील औरंगजेबची कबर काढून हैदराबादेत ओवेसीच्या दारात बांधा, त्यामुळं हैदराबादींना त्याला रोज पाहता येईल, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, राज्यात शिंदे गटाची सत्ता असताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कशासाठी मागणी करत आहेत?, शिंदे गटातील इतक्या मोठ्या नेत्यांना केंद्रातील नेत्यांच्या परवानगीची गरज कशासाठी पडते?, असा सवाल खासदार जलील यांनी केला आहे.
शिवसैनिकांनी कधी परवानगी घेतली होती का?, बाळासाहेब ठाकरेंनी कुणाची परवानगी घेतली होती का?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत जलील यांनी शिंदे गटावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाचा शिवसैनिक आता इतका कमजोर झाला आहे की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवानगीची गरज पडतेय?, असं म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्यावर सडकून टीका केली आहे.
औरंगजेबशी आमचा संबंध नाही- जलील
औरंगजेबशी आमचा काहीही संबंध नाहीये. त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं-देणं नाही, आमच्या आंदोलनात औरंगजेबचं पोस्टर्स झळकावणाऱ्या तरुणांचा आमच्या पक्षाशी संबंध नसून त्या प्रकरणात योग्य कारवाई केली जात असल्याचंही खासदार जलील यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यानंतर त्याविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यानंतर आता एमआयएम आणि शिंदे गटात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत.