mim mp imtiaz jaleel meet lawyer kapil sibal : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्याच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीलांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार जलील यांनी तब्बल १४ दिवस साखळी उपोषण केल्यानंतर आता त्यांनी नामांतराची लढाई सुप्रीम कोर्टात नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कारण आता खासदार इम्तियाज जलील यांच्यासह याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या कायदेशीर लढाईसाठी सिब्बल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळं आता औरंगाबादच्या नामांतराची लढाई सु्प्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औरंगाबादचं नामांतर करण्यात आल्यानंतर त्याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता खासदार इम्तियाज जलील यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेतल्यामुळं ही याचिका सुप्रीम कोर्टात वर्ग करण्यात येणार असल्याचे संकेत जलील यांनी दिले. याशिवाय एमआयएमचा नामांतराला विरोध असून कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या १४ दिवसांपासून नामांतराविरोधात सुरू असलेलं साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय खासदार जलील यांनी घेतला आहे. याशिवाय रविवारी हिंदू संघटना नामांतराच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्यामुळं शहरात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
रविवारी होणाऱ्या हिंदू संघटनांच्या मोर्चामध्ये काही चिथावणीखोर भाषणं करणारी व्यक्ती येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळं शहरातील वातावर खराब होऊ नये, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळंच मी साखळी उपोषण मागे घेतल्याचं खासदार इम्तियाज जलीलांनी म्हटलं आहे. आम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतर कुणी चिथावणीखोर भाषणं केल्यास आम्ही पुढच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असा इशाराही खासदार जलील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
संबंधित बातम्या