Gokul Milk Rate Hike: मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने (Gokul Dairy) दुधाच्या दरात वाढ केली आहे. गोकुळने गाईच्या दुधाच्या विक्रीत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाने ही दरवाढ केवळ मुंबई आणि पुण्यात केली असून १ जुलैपासून नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी असते. या दरवाढीमुळे मुंबई-पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
गोकुळकडून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ केली आहे. या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल. ही दरवाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असणार आहे. अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.
मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर तर पुणे शहरात ४० हजार लिटर मागणी आहे. दूधाची दरवाढ मुंबई आणि पुण्यातच करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात ही दरवाढ करण्यात येणार नाही, असं गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आलं आहे.
दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा कमी करण्यासाठी गोकुळने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. राज्यातील इतरही दूध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. यामुळे गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटकातील नंदिनी संघानेही दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.
खुल्या बाजारात दुधाचे भाव सध्या ९० रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध ७२ रुपये लिटर दराने मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध ७६ रुपये तर अमूल दूध ६८ रुपयांना विकले जात आहे.
दरम्यान दूधाला ४० रुपये भाव मिळावा म्हणून राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडून दूधाला प्रति लिटर ३५ रुपये दर घोषित करण्यात आला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घोषणा केली होती.