राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. पीसीएम, पीसीबी गटांसाठी एमएचटी सीईटी निकाल आज, १६ जून रोजी जाहीर केला आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आली होती. त्यात राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. परीक्षेला बसलेले उमेदवार cetcell.mahacet.org आणि portal. maharashtracet.org आणि महासीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. तसेच स्कोअरकार्ड डाऊनलोड करू शकतात.
निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना लॉग इन क्रेडेन्शियल्स म्हणून त्यांचे एमएचटी सीईटी रोल नंबर आणि पासवर्ड सारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील. विशेष म्हणजे पीसीबी आणि पीसीएम शाखांचा निकाल एकत्र जाहीर करण्यात आला आहे. एमएचटी सीईटी स्कोअरकार्डमध्ये उमेदवाराचे गुण, विषयनिहाय गुण आणि पर्सेंटाइल यासारख्या तपशीलांचा समावेश आहे.
एमएचटी सीईटी २०२४ पीसीबी ग्रुपसाठी २२ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ आणि पीसीएम ग्रुपसाठी २ मे ते १६ मे २०२४ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एमएचटी-सीईटी २०२४ परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात आली.
२१ मे रोजी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली असून पीसीबीसाठी २४ मे रोजी आणि पीसीएम गटासाठी २६ मे पर्यंत हरकती घेण्यात आल्या होत्या.
निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांना आता एमएचटी सीईटी काउंन्सलिंग २०२४ साठी उपस्थित राहावे लागेल ज्याच्या आधारे प्रवेशाचा विचार केला जाईल.
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीए) गटासाठी ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २ लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या