खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा-mhada lottery mhada house price decrease by 10 to 25 percent ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

Aug 28, 2024 06:57 PM IST

Mhada Home prices : म्हाडाच्या घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडेपाठ फिरवली होती.लोकांना कमी प्रतिसाद पाहून आतासरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी
म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी

आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मध्यम वर्गीयांचं स्वप्न आता आणखी आवाक्यात आलं आहे. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी केली. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी (Mumbai Mhada lottery) जाहीर करण्यात आली होती. मात्र घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली होती. लोकांना कमी प्रतिसाद पाहून आता सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

म्हाडाच्या यावर्षीच्या लॉटरीमधील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३ (५) मधील ३७० घरांना हा निर्णय लागू झाला आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या असून अर्ज करण्यासाठीची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

विविध पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. काही दिवसापूर्वी जाहीर झाल्ल्या मुंबई म्हाडा लॉटरी २०२४ मध्ये देखील या नव्या किमतीचा ग्राहकांना लाभ मिळणार आहे. आता गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील जवळपास २,०३० म्हाडा घरांच्या विक्रीसाठी नोंदणी व अर्ज प्रकिया सुरू झाली आहे.

कोणत्या घराच्या किंमतीत किती कपात ?

उच्च उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात

मध्यम गटासाठी १५ टक्के

अल्प गटासाठी २० टक्के

तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती २५ टक्क्यांनी कमी होणार आहेत.

म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर,  विक्रोळी,  शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. 

म्हाडा लॉटरीसाठी अर्ज कसा कराल?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी २०२४ साठीऑनलाइन अर्ज भरायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ  https://housing.mhada.gov.in वर लॉटरीसंदर्भात अपडेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाने ऑनलाईन अर्जसाठी मोबाइल अॅपदेखील सुरू केलं आहे. त्याच्या माध्यमातूनही नोंदणी केली जाऊ शकते. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदार म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करु शकणार आहेत. Mhada Lottery 2024 लिंक ९ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत लाइव्ह असणार आहे.