मुंबईत आपल्या हक्काचं घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. परवडणाऱ्या दरात मुंबईत स्वत:चं हक्काचं घर विकत घेण्याची संधी चालत आली आहे. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (Mhada) मुंबईत सप्टेंबरमध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. या लॉटरीमध्ये गोरेगाव येथील गृह प्रकल्पातील पॉश घरांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई शहरात दोन हजार परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
सोडती द्वारे देण्यात येणाऱ्या एकूण दोन हजार परवडणाऱ्या घरांपैकी बहुतांश घरे अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) असतील, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. त्याचबबरोबर मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) गटासाठी घरे उपलब्ध असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
या लॉटरीत उच्च उत्पन्न गटातील (एचआयजी) काही घरे असतील. म्हाडाच्या लॉटरी २०२४ मध्ये गोरेगावमधील काही प्रीमियम थ्री बीएचके अपार्टमेंटचीही विक्री केली जाईल, असे जयस्वाल यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात मुंबईसाठी लॉटरी काढण्याचे आमचे उद्दिष्ट असून काही दिवसांत अंतिम घोषणा होईल, असे जयस्वाल यांनी सांगितले.
म्हाडा च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि घर खरेदीदार लॉटरीशी संबंधित अपडेट्सचा मागोवा https://housing.mhada.gov.in/ या वेबसाईच्या माध्यमातून घेऊ शकतात.
म्हाडाने एक मोबाइल अ ॅप्लिकेशन देखील विकसित केले आहे जिथे अर्जदारांना स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तो म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करू शकतो.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडब्ल्यूएस श्रेणीतील घरांची किंमत साधारणत: ३० लाख रुपयांपासून सुरू होते आणि एचआयजी श्रेणीतील ३ बीएचके अपार्टमेंटची किंमत १ कोटी रुपयांच्या वर जाऊ शकते. सर्वाधिक किंमत एचआयजी श्रेणीतील ३ बीएचके अपार्टमेंटसाठी असेल. सूत्रांनी सांगितले की ३ बीएचकेची किंमत अद्याप निश्चित केलेली नाही परंतु ती १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते.
ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ६ लाख रुपयांपर्यंत आहे ते ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत घरासाठी अर्ज करू शकतात. ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एलआयजी प्रवर्गात अर्ज करता येईल. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ९ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे ते एमआयजी श्रेणीअंतर्गत आणि वार्षिक १२ लाख रुपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असलेल्यांसाठी एचआयजी श्रेणीअंतर्गत अर्ज करू शकतात.
लॉटरीसाठी पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न मानले जाते. व्यक्तीचे आई-वडील किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही.
म्हाडा लॉटरी २०२३ अंतर्गत राज्य गृहनिर्माण प्राधिकरणाने मुंबई शहरात पसरलेल्या ४,०८२ परवडणाऱ्या घरांची विक्री केली होती. म्हाडाकडे चार हजारांहून अधिक घरांसाठी एक लाखांहून अधिक अर्ज आले होते.
संबंधित बातम्या