Mhada Lottery 2024 : मुंबईत आपल्या हक्काचं घरं असाव असे अनेकांचं स्वप्न असते. मात्र, घरांच्या किंमती गगनाला भिडल्याने सामान्य लोक मुंबईपासून दूरच घर खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र आता तुमचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आहे.
म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आजसोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात येणार आहे. तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी २०२४ साठीऑनलाइन अर्ज भरायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in वर लॉटरीसंदर्भात अपडेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाने ऑनलाईन अर्जसाठी मोबाइल अॅपदेखील सुरू केलं आहे. त्याच्या माध्यमातूनही नोंदणी केली जाऊ शकते. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदार म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करु शकणार आहेत. Mhada Lottery 2024 लिंक ९ ऑगस्टपासून लाइव्ह करण्यात येणार आहे.
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ९ ऑगस्टपासून 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक म्हाडाकडून दुपारी १२.०० वाजेपासून उपलब्ध करून दिली जाईल. आधी नोंदणी केलेले अर्जदार देखील या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ९ ऑगस्ट २०२४ ते ०४ सप्टेंबर,२०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ०४ सप्टेंबर,२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची यादी दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्राप्त अर्जांची यादी ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक ११ सप्टेंबर,२०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.