Mhada Lottery 2024 : मुंबई म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे.म्हाडाच्या सदनिकांसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून त्याच रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दरम्यान, म्हाडाकडून ३७० घरांच्या किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या २०३० घरांच्यालॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून प्रारंभ झाला. १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध होणार आहे.
म्हाडाच्या लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सोडतीसाठी शुक्रवार (१३ सप्टेंबर, २०२४) रोजी सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जातून ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे, अर्जदारांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून ऑक्टोबर महिन्यातच म्हाडाचं घरं अनेकांचं स्वप्न पूर्ण करणार आहे.
मुंबई मंडळाच्या सन २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत.