MHADA Scheme: पुढील ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MHADA Scheme: पुढील ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा

MHADA Scheme: पुढील ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा

Published Feb 05, 2025 08:58 PM IST

Mhada Homes : सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून ८ लाख घरे उभारली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

 संगणकीय सोडत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे
संगणकीय सोडत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे

Mhada housing Scheme : प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून ८ लाख घरे उभारली जाणार असल्याची  घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार १४७ सदनिका आणि ११७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम पार पडला,  त्यावेळी ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले की, मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. सर्वसामान्य आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. 

अडीच वर्षात शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण आता नवीन गृहनिर्माण धोरण करतोय. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरे पाहिजेत, परवडणारी भाड्याची घरे पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरे पाहिजेत. वर्किंग वूमन साठी घरे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गिरणी कामगार, कंपन्यांमधील कामगारांसाठी घरे, पोलिसांसाठी, डबेवाले तसेच पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांनादेखील या माध्यमातून आपण घरे देणार आहोत.

पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार –

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. ५ वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देऊन त्यांची गुणवत्ता तपासणार आहोत. कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये २ हजार १४७ सदनिकांचा समावेश आहे. यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेमधील ५९४ सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील ७२८ सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील ८२५ सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण ३१ हजार ४६५ अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २३ चौरस मीटर ते ५० चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये १० लाख ते ३५ लाखापर्यंत आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर