Pune drugs racket : पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतांना आता पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad drug mafia)परिसरात तब्बल २ कोटी रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातदेखील मेफेड्रोन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका ड्रग्स तस्कराच्या मुसक्या सांगवी (sangvi police) पोलिसांनी शुक्रवारी आवळल्या. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौकात एका व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे दोन किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे.
नमामी झा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौकात एक व्यक्ति हा पांढरी पिशवी घेऊन थांबला होता. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या. याची माहिती सांगवी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी रक्षक चौकात येत सापळा रचत त्याला रक्षक चौकातून अटक करण्यात अलायी. त्याची झडती घेतली असता, झा याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीत २ कोटी २ लाखांचे २ किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळले. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले आहे. आरोपी झा कोणाला मेफ्रेड्रोन ड्रग्स देणार होता? त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे प्रश्न अनुत्तरित असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी ड्रग्स निर्मिती, वाहतूक आणि घाऊक विक्रीची साखळी नष्ट केली आहे. आता त्यांनी त्यांचा मोर्चा रिटेल ड्रग्स विक्रेत्यांकडे वळवला आहे. किरकोळ विक्रेते आणि पेडलरचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून तब्बल ५० जण पुणे पोलिसांच्या रडावर आहेत. त्यांची नावे निष्पन्न झाली असून या सर्वांचा शोध घेतला जात आहे. ही सर्व अंमली पदार्थ विक्रीतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून राज्यभर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. ही टोळी विशेषत: मेट्रो शहरात सक्रिय असल्याची माहिती आहे. या सोबतच पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तब्बल ५०० ते ६०० जणांची नावे पुढे आली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.