Pune University Traffic change: पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. येथील वाहतुकीत अनेकदा बदल करूनही कोंडी कायम असल्याने विद्यापीठ चौक प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. दरम्यान येथील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी पुन्हा बदल केला आहे. येथील सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहने चौकात न थांबता वेगाने पुढे जाणार आहेत.
पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. येथील रस्ते मोठे करण्यात आले असून काही मार्ग एकेरी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड येथे जाणारी वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. असे असले तरी येथील वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. या ठिकाणी असलेल्या सिग्नलमुळे चौकातच वाहने उभी राहत होती. वाहनांची संख्या मोठी असल्याने येथील रांग वाढत होती. पर्यायाने प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडीही वाढत होती. यामुळे आता येथील सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर विशेषत: विद्यापीठ चौकात कोंडी होत असल्याचे विद्यापीठ चौकापासून शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. ओैंध-बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. गणेशखिंड रस्त्याची पाहणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच केली. त्यांनी उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार ओैंध, बाणेरकडून येणारी वाहने तसेच, शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकातून ओैंध, बाणेर, पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी सिग्नलला न थांबता इच्छितस्थळी जावे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे- शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्याने रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनाांना बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातून थेट औंध बाणेरकडे जाण्यास बंदी. वाहनचालकांनी पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्तळी जावे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शिवाजीनगरकडून रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरुन वळून (यू टर्न) इच्छितस्थळी जावे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेकडून वळून इच्छितस्थळी जावे. बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे. बाणेर आणि ओैंधकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राजभवनच्या मागील बाजूस असलेला रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. ओैधकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री सोसायटीमार्गे ओैंधकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा.
संबंधित बातम्या