मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MegaBlock : रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त रेल्वेसेवा सुरळीत

MegaBlock : रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त रेल्वेसेवा सुरळीत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 02, 2022 10:43 PM IST

NO Megablock for mahaparinirvandin : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पश्चिम मार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर केवळ चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका
मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका

मुंबईत दर रविवारी रेल्वे ट्रकची देखभाल व दुरुस्तीसाठी मेगाब्ल़ॉक घेतला जातो. गेल्या आठवड्यात तर कर्नाक ब्रीज पाडकामासाठी सेंट्रल मार्गावर तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र येत्या रविवारच्या (४ डिसेंबर) मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत.महापरिनिर्वाणदिनानिमित्त आंबेडकर अनुयायी दोन दिवस आधीपासून मुंबईत येण्यास सुरूवात होते. त्यामुळे लोकल फेऱ्या आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे, यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेने ४ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

दरम्यान हार्बर व सेंट्रल मार्गावर मेगाब्लॉक नसला तरी पश्चिम रेल्वेने ३ डिसेंबर रोजी सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत असेल. मात्र सांताक्रुझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाने मुंबई, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानकावरून शिवाजी पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता ‘चैत्यभूमी फेरी’ या नावाने अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई शहरातील या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे ३, ४, ७ आणि ८ डिसेंबर रोजी मोफत बस फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' असं या फेरीचं नाव आहे. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत बस फेरीदौरान दादर (पश्चिम) येथील चैत्यभूमी, दादर (पूर्व) भागातले डॉ. बाबासाहेबांचे राजगृह हे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळ येथील बीआयटी चाळ आणि दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल.

या मोफत बस फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना सकाळी ९ वाजता दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथे एकत्र जमायचे आहे. पर्यटकांना बसने चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल.

 

 

IPL_Entry_Point