Mumbai Local Train: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (४ ऑगस्ट २०२४) मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर वर मानखुर्द ते वडाळा या दरम्यान मेगाब्लॉक असेल. हा मेगा ब्लॉक सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०४.०० वाजेपर्यंत असणार आहे.यामुळे प्रवाशांनी मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
- माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ०३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
- ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ०३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
- वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
- ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग बंद राहील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ०३.५४ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी ९.४० ते दुपारी ०३.२८ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.