Mega block of central railway : सीएसएमटी व ठाण्यातील फलाटांची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने तब्बल ६३ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेतला आहे. गुरुवारी मध्य रात्रीपासून या मेगाब्लॉकला सुरुवात झाली. ब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या ९०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आल्याने नोकरदार वर्गासह सामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची तुडूंब गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर या मेगाब्लॉकचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांवरही पडला आहे.
मध्ये रेल्वेच्या महा मेगाब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या (शनिवार) होणाऱ्या दोन परीक्षा रद्द केल्या आहेत. शनिवार १ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक आणि बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ ची एक अशा दोन परीक्षा होत्या. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
शुक्रवारी ( ३१ मे २०२४) रोजी विविध विद्याशाखांच्या एकूण ४३ परीक्षा पार पडल्या. आजच्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम या परीक्षांवर झाला नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर शनिवारच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
आज विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान शाखा तसेच आंतर विद्याशाखा अशा एकूण ४३ परीक्षा संपन्न झाल्या. मध्य रेल्वेकडून ठाणे येथे ६३ तासांचा तर सीएसएमटीला ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून या ब्लॉकला सुरूवात झाली. रविवार २ जून दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० आणि ११ त्याशिवाय ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ च्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉक वेळात एकूण ९५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे ३ दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या