मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह ७ जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची १०८ वी कारवाई
Pune crime
Pune crime (HT_PRINT)

Pune Crime : पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह ७ जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची १०८ वी कारवाई

24 November 2022, 16:59 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune MCOCA Crime news : पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर फास आवळला आहे. अनेक गुंडांच्या टोळ्यांवर त्यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तब्बल १०८ टोळ्यांवर त्यांनी कारवाई केली आहे.

पुणे : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे याच्यासह त्याच्या सात साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही १०८ वी तर यावर्षी केलेली ४५ वी कारवाई आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय २४, रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे) याच्यासह टोळी सदस्य चैतन्य रुक्मीदास ढाले (वय १८ रा. तळजाई माता वसाहत, सुवर्ण मंदिराजवळ, पर्वती, पुणे) आणि फरार असलेल्या ६ आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंग्या उर्फ विकी आखाडे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने ७ साथीदाराच्या मदतीने या परिसरात दहशत माजवली होती. आरोपींनी खुनाचा प्रयत्न, दरोडा, नागरिकांच्या मामलत्तेस नुकसान करणे, घातक शस्त्राने जखमी करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पूर्वी त्यांच्यावर कारवाई करून देखील त्यांची गुन्हेगारी वृत्ती थांबली नव्हती. यामुळे या टोळीवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात येत होती. या बाबतचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके यांनी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे यांना दिला होता. या कारवाईला अपर पोलीस आयुक्तांनी याला मंजुरी दिली आहे. विकी आखाडे आणि चैतन्य ढाले यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके, पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांच्या पथकाने केली.

विभाग