Mazi Ladki bahin yojana first installment : राज्यातील महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे ३०००रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र चार दिवस आधीच आजपासून योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते आणि राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र आता राम सातपुते व राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील या भाजप आमदारांनी पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.
बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. ३१ जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या २ महिन्यांचा हफ्ता म्हणजे प्रत्येकी ३००० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. ३१ जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे,असे ट्विट आमदार सातपुते यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येत आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक केल्यानंतर त्यांना तीन महिन्याची रक्कम दिली जाणार आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक आहे, त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा व्हायला सुरूवात झाली आहे. कोणताही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत,असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले आहे.