Ramesh Chennithala meets Matoshree : काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेदानंतर रखडलेली महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा आज पुन्हा सुरू होणार आहे. दिल्लीहून काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा तणाव निवळला आहे. राज्याच्या राजकारणातील 'मातोश्री'चा दबदबा कायम असल्याचं यातून दिसत आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही ‘मातोश्री’चा विशेष प्रभाव होता. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती असताना भाजपचे ज्येष्ठ नेते अधूनमधून 'मातोश्री'वर येऊन बाळासाहेबांशी चर्चा करत आणि वादाच्या विषयांवर तोडगा काढत. राजकारणाशिवाय इतर क्षेत्रातील लोकही आपापले वाद घेऊन 'मातोश्री'वर येत.
बाळासाहेबांच्या नंतर हा दबदबा कमी होईल असं बोललं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. २०१४ नंतर राज्यात भाजप मोठा भाऊ झाला, पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे देखील अनेकदा 'मातोश्री'वर येत होते. अगदी २०१९ च्या निवडणुकीच्या आधीही उद्धव ठाकरे यांची युतीसाठी मनधरणी करायला अमित शहा आले होते. त्यावेळी बंद दाराआड त्यांच्यात सत्तावाटपाची बोलणीही झाली होती. त्याच चर्चेमुळंच पुढं दोन्ही पक्ष वेगळे झाले.
कालांतरानं भाजपच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानं शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं आणि 'मातोश्री'चं महत्त्व संपलं असं बोललं गेलं. मात्र तेही झालेलं नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते ‘मातोश्री’वर जात होते.
सध्या सुरू असलेल्या जागावाटपाच्या वादानंतर पुन्हा एकदा 'मातोश्री'कडं मीडियाचे कॅमेरे वळले आहेत. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तोडगा निघताना दिसत नव्हता. नाना पटोले हे विदर्भात शिवसेनेला जागा सोडण्यास तयार नसल्यामुळं हा पेच निर्माण झाला होता. त्यामुळं संजय राऊत यांनी थेट दिल्लीत चर्चा सुरू केली होती. पटोले असेपर्यंत बैठकीला जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेकडून दिल्याचं सांगितलं गेलं. उद्धव ठाकरे यांनीही तुटेपर्यंत ताणू नका, असा गर्भित इशारा काँग्रेसला दिला. त्यानंतर आज चेन्निथला यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी इथं आलो होते असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. मात्र, ते कशासाठी आले होते हे लपून राहिलं नाही. कारण, जागावाटपाची चर्चा आजपासून पुन्हा सुरू होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘मातोश्री’ला डावलून काही होणार नाही हेच उद्धव यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या