मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी सांगितलं!

Sanjay Raut : निकाल आधीच फिक्स झालाय; कसा ते संजय राऊत यांनी सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 10, 2024 01:27 PM IST

Sanjay Raut on Shiv Sena Disqualification Case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील आजचा निकाल आधीच फिक्स झाला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on MLA Disqualification Verdict
Sanjay Raut on MLA Disqualification Verdict

Sanjay Raut on Shiv Sena Disqualification Case Verdict : शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. मात्र, या प्रकरणात प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला निकालाकडून अजिबात अपेक्षा नाही. खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलं आहे. हा निकाल आधीच फिक्स झाला असून आज फक्त तो जाहीर करण्याची औपचारिकता पार पडेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाचा परिणाम थेट राज्यातील शिंदे सरकारवर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागणार आहे. यामुळं हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे.

Shiv Sena MLA Disqualification Live : निकाल फिक्स करायचा असता तर आम्ही अध्यक्षांना दिवसाउजेडी भेटलो नसतो - मुख्यमंत्री

संजय राऊत यांनी आज या सगळ्यावर भाष्य केलं. आजचा निकाल हा आधीच ठरलेला आहे. न्यायमूर्ती स्वत: आरोपीला जाऊन भेटलेले आहेत. क्रिकेटमध्ये जसं फिक्सिंग चालतं, तसंच इथं झालं आहे. हा निकाल आधीच फिक्स झाला आहे. तो कसा आणि कधी सांगायचं हे काल ठरलं आहे, असं राऊत म्हणाले.

हा निकाल फिक्स असल्याच्या आपल्या वक्तव्याचा आधार म्हणून संजय राऊत यांनी काही दाखलेच दिले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १२ तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतायत. एका घटनाबाह्य सरकारचा निकाल आज लागणार आहे. अनेक अर्थांनी हे घटनाबाह्य सरकार आहे. त्याचा निकाल लागणार असताना पंतप्रधानांनी महाराष्ट्र दौरा जाहीर करणं हे सूचक आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? याचा अर्थ त्यांना निकालाची खात्री आहे. मोदींना निकाल माहीत आहे. निर्णय दिल्लीतून झालाय. फक्त लवाद त्याच्यावर शिक्का मारणार आहे, असं राऊत म्हणाले.

Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; 'सामना'तून खोचक टोलेबाजी

राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याचंही उदाहरण दिलं आहे. 'घटनेनुसार आजचा निकाल आला तर गेल्या दीड वर्षांपासून बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री असलेले शिंदे यांना पायउतार होऊ शकतात. मात्र, ते दावोस दौऱ्यावर चाललेत. लवाद निर्णय देणार असेल आणि घटनेनुसार देणार असेल आणि तुम्ही अपात्र ठरणार असाल तर तुम्ही दावोसला कुठल्या आत्मविश्वासानं जाताय? याचा अर्थ मॅच फिक्सिंग झालेली आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

आजचा निकाल ही औपचारिकता

'आज जे काही होणार आहे ती औपचारिकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं आणि नाईलाजानं राहुल नार्वेकर यांना निर्णय द्यावा लागणार आहे. मात्र, न्यायालयानं शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळं त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश बेकायदा आहे. राज्यपालांची प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे, असं न्यायालयानं आधीच म्हटलं आहे याकडंही राऊत यांनी लक्ष वेधलं.

WhatsApp channel