Pune Drugs racket mastermind sandip dhuniya : पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात पुणे पोलिसांना महत्वाचे धागे दोरे मिळाले आहे. ड्रग्स रॅकेटच्या मास्टर माइंड बद्दल माहिती पुढे आली असून तो नेपाळमार्गे कुवेतला पळाल्याचे देखील समोर आले आहे. संदीप धुनिया असे मुख्यआरोपीचे नाव असून तो मूळचा पाटणा येथील आहे. त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून त्याला नेपाळमध्ये या प्रकारचा कारखाना उभारायचा होता. मात्र, त्या पूर्वीच त्याच्या पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने तो नेपाळमार्गे कुवेतला पळाळा. पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आउट नोटिस बजावली असून रेड कॉर्नर नोटिस बजावण्याचे देखील काम सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया असल्याचे समोर आले आहे. संदीप धुनियाला २०१६ मध्ये महसुल गुप्तचर संचलानालयाने केलेल्या कारवाईत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून २६० किलो एमडी ड्रग्स देखील जप्त करण्यात आले होते. ही कारवाई देखील कुरकुंभ एमआयडीसीत करण्यात आली होती. धुनियाकडे ब्रिटीश पासपोर्टवर असून त्याला भारतात येण्यासाठी व्हिजाची गरज नसल्याने याचा फायदा त्याने घेतला. त्याने ड्रग्ज रॅकेट चालविण्याचा धंदा सुरू केला होता. दरम्यान, ३० जानेवारीला तो काटमांडु मार्गे कुवेतला पळाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
धुनियालाचा मित्र बिपीन कुमार याला देखील २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. तो सध्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणी येरवडा कारागृहात आहे. सोनम पंडीत ही बिपीन कुमारची पत्नी आहे. मात्र, धुनिया याने तिला आपली गर्लफ्रेंड बनविले. याबाबत बिपीनच्या वडीलांनी तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी साडे सतरा शे ते अठराशे किलो इतके मेफेड्रॉन जप्त केले आहे. यामध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक केले आहे.
पोलिसांनी आता पर्यन्त केलेल्या कारवाईत तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या या कारवाईचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांनी कौतुक केले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसीया (वय ३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय ३९) आणि संदीप कुमार (वय ४२, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांनाही ट्रान्झीट रिमांडद्वारे पुण्यातील न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.
कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबरोटरीज येथे छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांना तेथून देशातील विविध भागात मेफेड्रॉन पाठविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहा ते पंधरा पथके तयार करून पोलिसांनी दिल्लीसह राज्यातील विविध भागात छापे टाकले. यावेळी दिल्लीत मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. दररोज दहा दहा किलोच्या पॅकेटने फुड डिलीव्हरीच्या माध्यामातून मेफेड्रॉन लंडनला पाठविले जात होते. मागील दोन वर्षापासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. तर मकानदार हा धुनिया सोबत २०१६ च्या ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या मार्फत या प्रकरणाचा सखोल तपास केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी संदीप धुनियाला अटक करण्यासाठी त्याच्या विरोधात लुक आउट नोटिस दाखल केली आहे. तसेच रेड कॉर्नर नोटिस देखील बजावली जाणार आहे.
संबंधित बातम्या