why traffic jam in thane today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठाणे शहरातील हात नाका ब्रीज, आनंद नगर, जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. टोल नाका आणि अवजड वाहनांमुळं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील अनेक मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसाच्या शक्यतेमुळं लोकांनी कामावर जाण्यासाठी चारचाकी वाहनं बाहेर काढली. याशिवाय महामार्गावर अवजड वाहनांची संख्या अचानक वाढल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी कोपरी टोलनाक्यावर टोल न घेता वाहनं सोडण्याचे आदेश जारी केले आहे. तसेच शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने अद्यापही वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील घोडबंदर मार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं ठाण्यात दर दोन ते तीन दिवसांनी वाहतूक कोंडी होत असल्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता ठाण्यातील द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने लोकांना कामावर जाण्यास उशीर झाला. त्यामुळं वाहनचालक आणि नोकरदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.