Mumbra Thane Accident News Marathi : ठाण्यातील मुंब्रा परिसरात केमिकलची वाहतूक करणारा टँकर नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये टँकरचालकाला गंभीर मार लागला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यामुळं मुंब्रा बायपास रोडवर तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. टँकरमधून केमिकलचा उग्र वास आणि धूर येत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त टँकरला बाजूला हटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोईसरहून जालन्याच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव टँकरला पहाटे पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टँकरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड भरलेलं होतं. चालकाचं नियंत्रण सुटल्याने सुटल्याने टँकर थेट चर्नी पाडा येथील नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात चालक ब्रिजेश सरोळ यांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं.
अपघातग्रस्त टँकरमधून केमिकलचा धूर आणि उग्र वास येत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं पोलिसांनी तातडीने केमिकल एक्सपर्ट्सना घटनास्थळी बोलावलं आहे. नाल्यातील अपघातग्रस्त टँकरला जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. परंतु अपघातानंतर मुंब्रा बायपास रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं प्रवासी तसेच वाहनचालकांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या