Grant Road Fire : सांताक्रूझमधील एका इमारतीमध्ये लागलेली आग आटोक्यात येत नाही तोच, मुंबईत आगीची आणखी एक दुर्घटना घडली. काल मध्यरात्री ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमधील एका लाकडाच्या गोदामाला मोठी आग लागली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजतं.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जिथं आग लागली, तो परिसर टिंबर मार्केट म्हणून ओळखला जातो. गोदामाला लागलेली आग बाजूच्या रेस्टॉरंटमध्येही पसरल्याचं समजतंं. ही आग इतकी भयंकर होती की आगीचे अक्षरश: लोट स्पष्ट दिसत होते. त्यामुळं आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. खबरदारीचा उपाय म्हणून गोदामाच्या बाजूचा प्लॅटिनम मॉल आणि टॉवर रिकामे करण्यात आले आहेत. तिथल्या लोकांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.
आगीच्या खाक झालेल्या गोदामातील बाथरूममध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना एक अनोळखी व्यक्त जळालेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृत्यू झाल्याचं समजतं. त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अन्य कुणी व्यक्ती बेपत्ता आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
अग्निशमन दलाचे जवान अद्यापही घटनास्थळी असून आग आटोक्यात आणण्याचं आणि कूलिंगचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळं लागली हे कळू शकलेलं नाही. आगीच्या कारणांचा शोध सुरू आहे.
संबंधित बातम्या