Mumbai Fire News Today: मुंबईच्या सांताक्रूझ पश्चिम येथील मिलान सबवेजवळील ऑप्शन्स कमर्शियल सेंटरला सोमवारी संध्याकाळी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीवर अडकलेल्या ३७ जणांना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
सांताक्रूझ पश्चिमेकडील ऑप्शन कमर्शियल सेंटरमध्ये सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्ट शर्किटमुळे आग लागली, असा अंदाज व्यक्त केला जातो. ही आग सुरुवातीला इमारतीच्या तळमजल्यावर लागली. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पसरली.
अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक मोबाइल फायर टेंडर, एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, एक एरियल वर्क प्लॅटफॉर्म (एडब्ल्यूटीटी), दोन जेट टँक आणि एक टर्न टेबल लॅडर घटनास्थळी रवाना करण्यात आले.