Mathura Refinery Blast : मथुरा रिफायनरीमध्ये शटडाऊन प्रक्रियेअंतर्गत एव्ही युनिटच्या स्टार्टअप अॅक्टिव्हिटीदरम्यान अचानक स्फोट झाल्याने मंगळवारी सायंकाळी आग लागली. या घटनेत दोन अधिकाऱ्यांसह ८ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर चार जण रिफायनरी रुग्णालयात आणि एकावर सिम्स येथे उपचार सुरू आहेत. ही घटना का घडली ? याची चौकशी रिफायनरी व्यवस्थापनाकडून केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रिफायनरीच्या एव्ही युनिटमध्ये शटडाऊनच्या प्रक्रियेअंतर्गत स्टार्टअप अॅक्टिव्हिटी सुरू होती. यावेळी वेल्डिंग करताना मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे आजूबाजूला काम करणारे कर्मचारी आगीमुळे भाजले. स्फोटाचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून लोकांनी चारही बाजूंनी धाव घेतली. या घटनेमुळे रिफायनरीमध्ये गोंधळ उडाला होता.
आगीने काही वेळात भीषण रूप धारण केले. आग उग्र होऊ लागली. यावेळी तेथे उपस्थित अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. काही वेळातच रिफायनरीचे अग्निशमन दलही दाखल झाले. यामुळे आग आटोक्यात आली. जखमींना रुग्णवाहिकेतून रिफायनरी हॉस्पिटल आणि सिम्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रीफायनरीचे जनसंपर्क अधिकारी रेणू पाठक यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसातच्या सुमारास एव्ही युनिटमध्ये स्टार्टअप अॅक्टिव्हिटी होती. एव्हीयू (अॅटमॉस्फेरिक व्हॅक्यूम युनिट) मध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी स्फोट होऊन आग लागली. तर आठ कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील तिघांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीच्या घटनेच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे.
रिफायनरीमधील इंजिनीअर समीर श्रीवास्तव, राजीव, कर्मचारी इरफान (सर्व रा. रिफायनरी नगर), कंत्राटी कामगार मूलचंद पुत्र मुरलीधर रहिवासी गायत्री नगर कदंब विहार, सत्यभान पुत्र गंगाराम पुत्र गंगाराम (रा. कोल अलीपूर), हरिशंकर पुत्र दाऊजी निवासी कोल अलीपूर, अजय पुत्र जगदीश (रा. कोल अलीपूर), संतोष अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर राजीव, संतोष आणि इरफान यांची प्रकृती चिंताजनक आहे. या तिघांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी इरफान हा सर्वाधिक भाजल्याने त्याची प्रकृती ही चितांजनक आहे.