Beed Santosh Deshmukh murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. तरी सुद्धा आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आज सोमवारी थेट मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मीक पुण्यात सीआयाडीच्या अधिकाऱ्यांना शरण आला होता. या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना पुण्यातून बीड पोलिसांनी अटक केली होती. सीआयडी व एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आरोपी वाल्मीक कराड यावर मोक्का लावण्याची मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली होती. मात्र, अद्याप या प्रकरणी आरोपींवर कारवाई न झाल्याने संपूर्ण गाव आता आक्रमक झाले आहे. आज देशमुख कुटुंबियांसोबत संपूर्ण गामस्थ मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत.
वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करून त्याच्यावर मोक्का लावावा व फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. या साठी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लावत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आजच्या अंदोलनाबाबत ग्रामस्थांनी रविवारी बैठक घेतली होती. वाल्मीक कराडवर मोक्का लावा, सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, मोकाट कृष्णा आंधळेला अटक करा, शासकीय वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या बैठकीत केल्या होत्या. तसेच सोमवार पासून आंदोलन सुरू करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला होता.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व ग्रामस्थ आज सकाळी १० पासून आंदोलन सुरू करणार आहे. मोबाईल टॉवरवर चढून हे आंदोन केले जाणार आहे. तर उद्या मंगळवारी (दि १४) सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या बाबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचविण्यात येते आहे. या प्रकरणातील आरोपी सुटले तर हे आरोपी देशमुख कुटुंबीयांना संपवणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मोबाइल टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून जीवन संपवेन असे धनंजय देशमुख म्हणाले.
संबंधित बातम्या