१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१ जुलै) लष्कराच्या अग्निवीर योजनेवरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही,शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक भरपाई दिली जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांचा उल्लेख केला. यानंतर बुलढाण्यातील शहीदाच्या कुटूंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानंतर बुलढाण्यातील शहीद अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी मोठा खुलासा केला आहे. लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण १ कोटी १० लाख रुपयांची सरकारकडून आर्थिक मदत मिळाल्याची माहिती दिली आहे.
शहीद अक्षय गवते हा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवासी होता. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असताना तो शहीद झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा वयाच्या २० व्या वर्षीच मृत्यू झाला होता.
अक्षय गवते यांच्यावडिलांची या गोष्टीची खंत -
राहुल गांधी यांनी अग्निवीरचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला शहीद अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, त्यांना एकूण १ कोटी १० लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे. आतापर्यंत त्यांना विम्याचे५०लाख रुपये इतर ५० लाख आणि राज्य सरकारकडून १० लाख असे १ कोटी १० लाख रुपये त्यांना मिळाले आहे. मात्र अक्षय गवतेला शहीद हा दर्जा सरकारकडून देण्यात आला नसल्याचेही अक्षय गवते यांच्या वडिलांनी सांगितले आहे.
अग्नीवीर योजनेवर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला आवश्यक आर्थिक मदत करण्यात आली आहे. शहीदांना गार्ड ऑफ ऑनरही दिला आहे. जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये अग्निवीर अक्षय गवते यांना हौतात्म्य आले होते.
मृत्यूनंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. अक्षय गवते याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हौतात्म्य आले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या