Markadwadi Village vothing : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला होता. या विरोधात आज मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार होते. मात्र, या मतदानाला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश दिले होते. गावात मोठा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यामुळे गावाला छावणीचे रूप आले होते. तरी सुद्धा ग्रामस्थ मतदान घेण्यावर ठाम होते. आज सकाळी नागरिक मतदान करण्यासाठी जमले असता पोलिसांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर आज गावात होणारे मतदान रद्द करण्यात आले.
बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू, असा निर्धार व्यक्त करत मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे पोलिसांनी गावात जमावबंदीचा आदेश लागू केला होता. मात्र, मतदानप्रक्रिया राबवण्यावर ग्रामस्थ ठाम होते. आज मंगळवारी सकाळी मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडत होते. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना दम दिल्यावर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन येथील मतपत्रिकेवर मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उत्तमराव जानकर यांनी मध्यमांशी संवाद देखील साधला.
मारकडवाडी या गावातील नागरिक म्हणाले, महाविकास आघाडीचे बहुतांश समर्थक या ठिकाणी राहतात. मात्र, शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर या मतदार संघातून विजयी झालेले असतांना मारकडवाडी गावात महायुतीचे राम सातपुते यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे जानकर यांचे मताधिक्य कमी होण्यामागे ईव्हीएम दोषी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने ८० टक्के मतदान झाले असताना ईव्हीएममधून मात्र, वेगळीच आकडेवारी पुढे आली. गावात राम सातपुते यांना सर्वाधिक मते पडली. त्यामुळे गावात आज मतपत्रिकेवर निवडणूक घेतले जाणार होते. मात्र, या विरोधात पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करत काही ग्रामस्थांना नोटिसा पाठवल्या होत्या.
यावेळी जाणकर म्हणाले, गावकऱ्यांशी चर्चा करून आम्ही कायदेशीर मार्गाने ईव्हीएम लढवण्याचा निर्णय घेतला. कारण पोलिस आम्हाला ही निवडणूक घेऊ देत नाहीत.पोलिसांनी आम्हाला दम दिला. तसेच एक जरी मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करु, असे सांगितले. गावात आधीच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितल्याने ग्रामस्थांशी चर्चा करून मतदान रद्द केले. जर पोलीस मतदान करुन देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरुन ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट होऊन मतदानासाठी आलेले लोक निघून जातील. त्यामुळे हे मतदान रद्द करण्यात आले.
तर हे मतदान पूर्णपणे बेकायदेशीर असून अशा प्रकारे मतदान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी फेरमतदानाचे आवाहन केले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई केली. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावात महाविकास आघाडीचे मतदार जास्त असले तरी ईव्हीएममध्ये चुकीची आकडेवारी दिसत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, भाजप समर्थकांनी या मतदानात सहभागी होणार नसल्याचे आधीच सांगितले होते.
एका गावकऱ्याने सांगितले की, गावातील लोकांनी मॉक रिपोलचे नियोजन केले होते. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कालपासून २०० हून अधिक पोलिस गावात आले आणि त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. उद्या निवडणुका झाल्या तर त्यांचे भवितव्य संपुष्टात येईल आणि ते न्यायालयात भेटतील, अशी नोटीस तीस जणांना देण्यात आली होती. जवळपास ७०० लोक मतदानासाठी पोहोचले होते. पण मग ती पुढे ढकलून ही लढाई दुसऱ्या मार्गाने लढावी, असा निर्णय घेण्यात आला.
संबंधित बातम्या