लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनावेळी संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो यांच्यासह प्रमुखांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर केलेल्या भाषणावेळी बोलताना शरद पवार यांनी साहित्यिक आणि साहित्य रसिकांना आवाहन करताना म्हटलं की, "आपल्या देशात विशिष्ट असा विचारधारेचा प्रोपगंडा फैलावताना दिसतोय. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावं."
समाजकारणी, राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद इत्यादी वाद जन्माला आले. पण आताच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटकांकडून भार दिला जातोय. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचं शरद पवार म्हणाले. प्रोपगंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि यामुळे अराजकता ओढवते. हिटलरने माइन काम्फ पुस्तक आणि इतर माध्यमातून केलेला प्रोपगंडा हे त्याचं भयानक उदाहरण असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.
साहित्य मुक्त असायला हवं, याचा अर्थ ते कोणत्या विचारधारेला बांधील नसावं, अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते, त्यात बुद्धीभेद, ध्रुवीकरण, विषारी स्वरुपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी मते असू शकतात. साहित्यिकांनी त्रयस्थाप्रमाणे त्याकडे पहायला हवं. राज्यकर्ते थेटपणे प्रोपगंडा करत नाहीत. त्यांनी साहित्य किंवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांबद्दल त्यांनी हुशारीने कार्पोरेट जगाची मदत घेत प्रोपगंडा राबवणं सुरु केलंय. चित्रपट क्षेत्रात तर झालेला शिरकाव स्पष्टच दिसतोय असंही पवार म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षपदासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी पाच वर्षातून किमान एकदा तरी महिला अध्यक्ष होण्यासाठी तरतूद व्हावी. पहिले साहित्य संमेलन १८७८ मध्ये झाले. त्यानंतर महिला अध्यक्ष व्हायला १९६१ हे वर्ष उजाडावे लागले असंही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या