मराठी माणसाला राग पटकन येतो; प्रख्यात साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं निरीक्षण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठी माणसाला राग पटकन येतो; प्रख्यात साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं निरीक्षण

मराठी माणसाला राग पटकन येतो; प्रख्यात साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं निरीक्षण

Jul 08, 2024 01:32 PM IST

S L Bhyrappa in Mumbai : प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी भैरप्पा यांनी मराठी वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

मराठी माणसाला राग पटकन येतो; प्रख्यात साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं निरीक्षण
मराठी माणसाला राग पटकन येतो; प्रख्यात साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं निरीक्षण

S L Bhyrappa on creative writing : ‘मुंबई हे देशातील सर्वात खरंखुरं शहर आहे. हे शहर मला आवडतं. माझ्या वंशवृक्ष कादंबरीची कथा मुंबईतच आकार घेते. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील वाचकांनी मला खूप प्रेम दिलंय,’ अशी कृतज्ञता प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी नुकतीच व्यक्त केली. ‘मराठी माणसाला राग पटकन येतो,’ असं निरीक्षणही त्यांनी आपल्या उमेदीच्या काळातील एक किस्सा सांगून नोंदवलं.

मुंबई मराठी साहित्य संघात ६ जुलै रोजी ‘गप्पा भैरप्पांशी’ हा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भैरप्पा बोलत होते. प्रसिद्ध अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांच्याशी संवाद साधला.

सर्जनशील लेखक म्हणून आपली जडणघडण कशी झाली याविषयी भैरप्पा यांनी यावेळी सांगितलं. कुठलंही लिखाण हे पूर्वतयारी आणि कष्टाशिवाय होऊ शकत नाही हे मी अनुभवानं सांगतो. वंशवृक्ष, धर्मश्री या कादंबऱ्या लिहिताना पा. वा. काणे यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचा अभ्यास मी केला होता. हिंदू कायदा समजून घ्यायचा असेल तर भैरप्पांची कादंबरी वाचा असं काही कायद्याचे अभ्यासक म्हणायचे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

मराठी वाचकांबद्दल त्यांनी आत्मीयता व्यक्त केली. भैरप्पा हा कन्नडमध्ये लिहिणारा मराठी साहित्यिक आहे असं काही लोक म्हणतात, इतकी माझी मराठीशी जवळीक असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी माणसाच्या रागाचा किस्सा सांगताना त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, 'तत्वज्ञानावर डॉक्टरेट करत असतानाच मी लेखनाकडं वळलो. कादंबरी लिहू लागलो. त्यावेळी जावडेकर नावाचे एक मराठी गृहस्थ माझे पीएचडीचे गाईड होते. त्यांना माझ्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांना जेव्हा कळलं की मी कादंबऱ्या वगैरे लिहायला लागलोय. त्यावेळी ते भडकले. तू कष्टाळू आणि हुशार आहेस, पण कादंबरी नावाच्या भूतानं तुला पछाडलंय, असं ते रागानं म्हणाले. त्यानंतर आमच्यात दुरावा आला. मात्र मी एक उत्तम कादंबरी लिहिल्याचं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते स्वत: माझ्याकडं आले. माझ्यासाठी शर्ट, पँटचं कापड आणलं आणि शिलाईसाठी १५० रुपये देऊन गेले, अशी आठवण भैरप्पांनी सांगितली.

भैरप्पांशी गप्पा झाल्या, पण रंगल्या नाहीत!

वंशवृक्ष, पर्व, आवरण, धर्मश्री, यान, मंद्र अशा असंख्य गाजलेल्या पुस्तकांचे लेखक भैरप्पा यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम असल्यानं साहित्यप्रेमींमध्ये उत्साह होता. कार्यक्रमाला उपस्थितीही चांगली होती. मात्र, भैरप्पा यांचं वय आणि सगळ्याच गोष्टी पटकन आठवणं शक्य नसल्यामुळं गप्पा फार रंगल्या नाहीत. आताच्या काळातील वातावरणाबाबत त्यांना काय वाटतं अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकली नाहीत. उमा कुलकर्णी यांनीच भैरप्पांच्या वतीनं काही प्रश्नांची उत्तरं दिली. भैरप्पा यांच्या लिखाणाचा पट किती विस्तृत आहे हे त्यांच्या 'यान' या कादंबरीबद्दल थोडक्यात माहिती देऊन उमा कुलकर्णी यांनी सांगितलं.

प्रा. उषा तांबे, अश्विनी भालेराव, प्रकाश पागे, अशोक बेंडखळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर